जग सारे झाले गुलाबी
आज मी प्रेमात आहे.
नच दिसे कोठे खराबी
आज मी प्रेमात आहे...
पेटी वाहणारी कचर्याची,
भासे मज कुंडी फुलांची.
रस्ता खड्डयात हरवलेला,
चंद्र मज हा भासताहे.
आज मी प्रेमात आहे...
थुंकणारी ही जी जनता,
वाटते मज पुज्य देवता.
उकिरड्यावरचे ते डुक्कर,
जणू गोंडस ससाच आह
आज मी प्रेमात आहे...
धुर वहानांचा हा जो दाटे,
धुकेच मजला तेचि वाटे.
पोलिसमामा चौकामधला,
योग्यासमान दिसतो आहे.
आज मी प्रेमात आहे...
वहानाचा मज लागे धक्का,
साँरी'म्हणुनि हसलो बरका!
माझ्या सगळ्या शत्रुंनाही,
आज सलाम करतो आहे.
आज मी प्रेमात आहे...
Friday, July 18, 2008
Wednesday, July 9, 2008
असेच हे...
असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे... नसायचे
असेच सोससोसता
हसून हासवायचे;
असेच हासहासता
हळूच विव्हळायचे
असाच राहणार मी
जिता तुरुंग आपुला,
अशाच बाळगीन मी
सुटावयास श्रृंखला
असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका
अशीच येथली दया
हवेत चाचपायची;
अशीच जीवनास ह्या
पुन्हा क्षमा करायची
असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा
असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्या हव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.
असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.
- सुरेश भट
Subscribe to:
Comments (Atom)
