Sunday, August 10, 2008

मनातल्या मनात

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !
असेच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळुच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तु फुले,
असेच सांग लजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या,तुझी फुले इथे तिपुन काढतो !

अजून तू अजाण ह्या,
कुवार कर्दळीपरी;
गडे विचार जणत्या
जुईस एकदा तरी :
"दुरुन कोण हा तुझा मरंद रोज चाखतो?"

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा;
तुझी रुपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !
- सुरेश भट

Friday, July 18, 2008

आज मी प्रेमात आहे...

जग सारे झाले गुलाबी
आज मी प्रेमात आहे.
नच दिसे कोठे खराबी
आज मी प्रेमात आहे...


पेटी वाहणारी कचर्याची,
भासे मज कुंडी फुलांची.
रस्ता खड्डयात हरवलेला,
चंद्र मज हा भासताहे.
आज मी प्रेमात आहे...


थुंकणारी ही जी जनता,
वाटते मज पुज्य देवता.
उकिरड्यावरचे ते डुक्कर,
जणू गोंडस ससाच आह
आज मी प्रेमात आहे...


धुर वहानांचा हा जो दाटे,
धुकेच मजला तेचि वाटे.
पोलिसमामा चौकामधला,
योग्यासमान दिसतो आहे.
आज मी प्रेमात आहे...


वहानाचा मज लागे धक्का,
साँरी'म्हणुनि हसलो बरका!
माझ्या सगळ्या शत्रुंनाही,
आज सलाम करतो आहे.
आज मी प्रेमात आहे...

Wednesday, July 9, 2008

असेच हे...


असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे... नसायचे

असेच सोससोसता
हसून हासवायचे;
असेच हासहासता
हळूच विव्हळायचे

असाच राहणार मी
जिता तुरुंग आपुला,
अशाच बाळगीन मी
सुटावयास श्रृंखला

असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका

अशीच येथली दया
हवेत चाचपायची;
अशीच जीवनास ह्या
पुन्हा क्षमा करायची

असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा

असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्या हव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.

असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.

- सुरेश भट

Saturday, June 14, 2008

दिवे लागले रे

दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळतांना
कुणी जागले रे? कुणी जागले?

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले;
तिथे मोकळा मी मला हुंगितांना
उरी गंध कल्लोळुनी फाकले...

उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन
उष:सूक्त ओठात ओथंबले...

- शंकर रामाणी (पालाण)

Monday, June 2, 2008

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे

जाऊ दे 'कार्पण्य' 'मी' चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी

- बा. सी. मर्ढेकर

Sunday, May 11, 2008

प्रेम कुणावर कराव ?

प्रेम
प्रेम कुणावर कराव ?
प्रेम कुणावर ही करावं.

प्रेम
राधेच्या वत्स्ल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या वीद्रुप कुबड्यावर करावं,
भीष्म द्रोणाच्या थकलेल्या चरणावर करावं,
दुर्योधन कर्णाच्या आभिमानी,
अपरजित मरणावर करावं
प्रेम कुणावर ही करावं.

प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठावर् करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
मोराच्या पिसार्यातील अदुभुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,
आणि खड्गाच्या पात्यावरही करावं
प्रेम कुणावर ही करावं.

प्रेम
ज्याला तारायचाय त्याच्यावर तर करावंच
पण ज्याला मारायचय त्याच्यावरही करावं,
प्रेम योगावर करावं,
प्रेम भोगावर करावं,
आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं,

प्रेम
प्रेम कुणावर करावं
प्रेम कुणावर ही करावं.

- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

Sunday, April 20, 2008

झाली अबोल संध्या

झाली अबोल संध्या सारे काही मुके,
निःशब्द वेळी अशा जीवही उगा सुके.

ओतल्या प्राक्तनाच्या रेषा काळ्या बेहोशिबी,
बेईमान शब्द सारे होती आज पारके.

बहर प्राजक्ताचा आंगणात तयांच्या,
सडाही प्रांगणी माझ्या फिरुनि ना चुके.

मांडला भावनांचा बाजार एकदा मी,
उचलुनि चीजां सार्या हासती ग्राहके.

नकोत घावं टाकिचे,नको देवपण,
एक क्षण ही ना जगलो माणसांसारखे

म्रुत्युनंतर माझ्या गिधाडे न नाचतील,
झिंगूनि मात्र ते उडवतिल फटाके.

-अरुण नंदन

Saturday, April 12, 2008

"पिपांत मेले ओल्या उंदिर"



पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;


ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.


गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;


दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;

मरायची पण सक्ती आहे.


उदासतेला जहरी डोळे

काचेचे पण;


मधाळ पोळे;

ओठांवरती जमले तेंही

बेकलाइटी, बेकलाइटी!


ओठांवरती ओठ लागले;

पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!
- बाळ सीताराम मर्ढेकर